गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी येथील एका विवाहितेने आपल्या चार वर्षीय मुलासह गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी महिलेचे आधार कार्ड व लिहिलेली चिठ्ठी पायरीवर ठेवलेले पोलिसांना आढळून आले. तसेच संबधित महिलेचा पती सासरा व सासू फरार आढळून आल्याने विवाहितेचे वडिलांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे.
सौ. प्रतीक्षा गजानन भांबरे (वय २५) या महिलेने गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खळी पुलाजवळ असलेल्या गोदावरी नदी पात्रात आपल्या मुलाला माणिक गजानन भांबरे (वय ४) घेऊन सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उडी घेतली. काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाला. मुळी बंधाऱ्या मुळे पाणी पातळी वाढलेली असल्याने बुडण्यास विलंब लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पीएसआय राम गीते, जमादार मुंजा वाघमारे आणि राहुल व्हावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन कर्मचारी रामविलास खंडेलवाल, शाम जगतकर, अभिजित साळवे, श्रीकांत साळवे, सूरज खंडेलवाल, आकाश लव्हाळे आणि सीताराम भेंडेकर यांनी दोघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी गंगाखेड पोलिसांकडून तपास सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.