पूर्णा : विजयादशमी आणि दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर चांगल्या उत्पन्नाची आस धरलेल्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी यंदा तीव्र निराशा पडली आहे. बाजारात फुलांची आवक प्रचंड वाढल्यामुळे अखेर ग्राहकांना विनंती करून अवघ्या १५ ते २० रुपये प्रति किलो भावाने झेंडूची फुले विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली. यामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे दसरा व दिवाळी सणाचे औचित्य साधून वसमत व पूर्णा परिसरातील शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. यंदा परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर आणि योग्य व्यवस्थापन करून झेंडूचे उत्तम पीक घेतले. मात्र, दसऱ्याच्या दिवशी बाजारात सर्वच बाजूंनी झेंडूची मोठी आवक झाली. अक्षरशः रस्त्याच्या दुतर्फा फुलांचे ढीग लागल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले तरीही ४० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला होता. यंदा दुष्काळामुळे उत्पादन कमी होऊन फुलांना चांगला भाव मिळेल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती ती निरर्थक ठरली. अचानक वाढलेल्या आवकमुळे भाव पूर्णपणे कोसळले. झेंडू विक्रीसाठी आणलेले शेतकरी रखरखत्या उन्हात दिवसभर बसून भाव वाढण्याची प्रतीक्षा करत होते. मात्र, आवक जास्त असल्याने ग्राहक फिरकत नव्हते. अनेक शेतकऱ्यांना दिवसभर बसूनही फुले विकता आली नाहीत, त्यामुळे उरलेला माल परत घरी नेण्याची वेळ त्यांच्यावर आली.
मी यंदा दसऱ्याच्या मुहूर्तासाठी अर्धा एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली होती. कोरडा दुष्काळ असूनही योग्य निगा राखून ६० हजार रुपये खर्च करून पीक आणले. पण बाजारात भावच नसल्यामुळे घातलेला खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे. या बिकट परिस्थितीत शासनाने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देऊन दिलासा द्यावा.पंढरी अंबोरे (झेंडू उत्पादक शेतकरी, सातेफळ अंबोरे)