परभणी

परभणीत जरांगेंच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी कडकडीत बंद

मोहन कारंडे

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने तातडीने अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेवर कायदा करावा, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला.

राज्य सरकारने मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे बाबतची अधिसूचना काढण्यात आली होती. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची तब्येत खालावत आहे. सकल मराठा समाजाच्या भावना सरकारच्या विरोधात तीव्र होत आहेत. दरम्यान जिंतूर शहरातील सकल मराठा समाजाने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन बंद पाळण्याचे आवाहन केले होते. यावेळी सकल मराठा समाजातील तरुणांनी प्रमुख रस्त्यावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचे अश्वासन दिले होते. त्यांनी आपले आश्वासन पूर्ण करून जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ताडकळस बाजार पेठ कडकडीत बंद

ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : विधीमंडळ अधिवेशनात सगेसोयरे अधिसुचनेचा मसुदा पटलावर ठेवून कायदा पारीत करण्याच्या मागणीसाठी बुधवारी संपूर्ण ताडकळस बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे व विरोधी पक्षात असलेल्या सर्व‌ आमदार व पक्षांनी सदर कायद्याला समर्थन देवून मराठा समाजातील गरजवंत नागरीकांना तातडीने न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.

पूर्णा शहरासह तालूक्यातील बाजारपेठा बंद

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : सगेसोयरे अध्यादेशाची विधीमंडळ अधिवेशन घेवून कायदा पारीत करण्याच्या मागणीसाठी आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्याकरीता बुधवारी सकाळपासूनच पूर्णा शहरासह तालूक्यातील ताडकळस, कावलगाव, झिरोफाटा, वझूर, लिमला, चुडावा या मोठ्या गावातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. मंगळवारी पूर्णा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून पूर्णा बंदची हाक देण्यात आली होती. तीस व्यापारी बांधवांनी मोठा पाठींबा देवून आपली दूकाने बंद ठेवली.

लिमला-देऊळगाव येथील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ लिमला येथे लक्ष्मण शंकररावजी शिंदे यांनी तीन दिवसांपासून उपोषण सूर केले आहे. तर देवूळगाव दुधाटे येथे भगवान रामकिशन‌ दुधाटे, नवनाथ वैजनाथ दुधाटे, उद्धव टोपाजी दुधाटे, मुंजा प्रल्हाद दुधाटे हे गेल्या चार दिवसांपासून अमरण उपोषणास बसले असून त्यांची तब्येत खालावली असल्याचे गावक-यांनी सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT