Hanuman Temple Sabhamandap Collapse Manwath
मानवत : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या बांधकामाचा स्लॅब शनिवारी (दि.२०) दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 4 ते 5 भाविकांचा मृत्यू झाला. तर 20 ते 25 भाविक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मानवत–परभणी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा शिवारात असलेल्या यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिराला परिसरात विशेष धार्मिक महत्त्व आहे. दर शनिवारी विविध जिल्ह्यांतील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात सध्या गाभारा व सभामंडपाच्या विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या बांधकामात मोठ्या प्रमाणावर दगडांचा वापर करण्यात येत होता.
शनिवारी दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली असताना बांधकामाचा काही भाग अचानक कोसळला. विशेषतः दगडी बांधकामाचा भाग भाविकांवर पडल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत काही भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घटना घडताच उपस्थित भाविकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. मानवत, परभणी, सेलू आणि पाथरी येथून रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना उपचारासाठी परभणी येथील विविध रुग्णालयांत हलविण्यात येत असून प्रशासनाकडून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.