मानवत : तालुक्यातील यशवाडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर शनिवारी (दि. २८) सकाळी दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमीला पुढील उपचारांसाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर यशवाडी गावाजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास एमएच ०३ बीडब्ल्यू २७५८ आणि एमएच २२ बीसी २७४३ क्रमांकाच्या दोन कारची धडक झाली. यातील एक कार दर्शनासाठी जात असल्याची माहिती आहे. अपघाताची धडक इतकी जोरदार होती की, एका कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या घटनेत परभणी येथील लक्ष्मण टेरे हे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले.
दरम्यान, मानवत ते परभणी या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.