मानवत: मानवत तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या ४ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी (२१ जानेवारी) राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ५८ असे एकूण १०६ अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या ४ गटांमध्ये उमेदवारांची मोठी चुरस पाहायला मिळत आहे. यामध्ये रामपुरी गटात सर्वाधिक १५ अर्ज आले आहेत. आरक्षणानुसार कोल्हा व ताडबोरगाव हे गट सर्वसाधारण, केकरजवळा ओबीसी महिला आणि रामपुरी बु. गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. पंचायत समितीच्या ८ गणांमध्येही हीच स्थिती असून मानोली, किन्होळा बु. आणि रामपुरी बु. हे गण सर्वसाधारण महिलेसाठी, पाळोदी व मंगरूळ बु. सर्वसाधारण, कोल्हा ओबीसी, ताडबोरगाव ओबीसी महिला तर केकरजवळा गण अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.
जिल्हा परिषद गट:
रामपुरी: १५ अर्ज
ताडबोरगाव: १३ अर्ज
केकरजवळा: ११ अर्ज
कोल्हा: ०९ अर्ज
पंचायत समिती गण:
मंगरूळ: १० अर्ज
केकरजवळा: ०९ अर्ज
रामपुरी: ०८ अर्ज
मानोली, कोल्हा, ताडबोरगाव: प्रत्येकी ७ अर्ज
किन्होळा: ०६ अर्ज
पाळोदी: ०४ अर्ज
तालुक्यात १६ ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्रे स्वीकारली गेली. सद्यस्थितीत कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने आपली अधिकृत युती किंवा आघाडी जाहीर केलेली नाही. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरल्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची दाट शक्यता आहे. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी संपूर्ण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे.