Manwat Municipal Council Election News Pudhari
परभणी

Manwat Municipal Election | मानवत नगरपालिका निवडणूक : क्रॉसवोटिंग, नोटा मुळे बिघडले अनेकांचे गणित, थोडक्यात अनेकांचे स्वप्न भंगले

भाजप, शिवसेना ठाकरे गटाचा 1 नगरसेवक, काँग्रेसचा सुफडासाफ

पुढारी वृत्तसेवा

Manwat Municipal Council Election News

डॉ. सचिन चिद्रवार

मानवत : मानवत नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत काही प्रभागात क्रॉस वोटिंगचा तर काही प्रभागात नोटाचा पर्याय मतदारांनी निवडल्याने काही जणांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 तसेच शिवसेना शिंदे गट 4, भाजप व शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येकी 1 उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले. मात्र, काँग्रेस चा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.

सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या येथील नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या राणी अंकुश लाड व शिवसेना शिंदे गटाच्या अंजली महेश कोक्कर यांच्यात झालेल्या थेट लढतीत राणी लाड यांनी बाजी मारत 5391 ची लीड मिळवली. एकूण 11 प्रभागातील 22 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 6 ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले तरी देखील त्या प्रभागात क्रॉस वोटिंग झाल्याने राणी लाड यांना सर्वत्र लीड मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी 23989 मतदारापैकी 206 जणांनी नोटाचा पर्याय स्वीकाराला.

प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असलेले माजी नगराध्यक्ष गणेश कुमावत हे अवघ्या दोन मतांनी पराभूत झाले त्यांना 965 प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे ऍड विक्रमसिंह दहे यांना 967 तर नोटाला 28 मते पडली. प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या वृषाली राहाटे यांनी 7 मतांनी विजय मिळवला. राहाटे यांना 674, शिवसेनेच्या स्वाती पाटील यांना 665 तर शिवसेना उभाठा च्या ज्योती बारहाते यांना 604 तर नोटाला 17 जणांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये देखील राष्ट्रवादीच्या ज्योती आळसपुरे यांनी शिवसेनेच्या शीतल कुऱ्हाडे यांचा 10 मतांनी पराभव केला. या ठिकाणी देखील 32 मतदारांनी नोटाला मतदान केल्याचे दिसून आले.

विरोधी पक्षाला 6 जागा

सदस्य पदासाठीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला लढविलेल्या 14 जागेपैकी 4 जागेवर यश मिळाले. प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये विभा भदर्गे, 5 अ मध्ये ऍड विक्रमसिंह दहे, तर प्रभाग क्रमांक 8 अ व ब मधून शेख जवेरिया बेगम व मोहम्मद बिलाल बागवान या दोन मुस्लिम उमेदवारांनी यश मिळवले. या निवडणुकीत

भाजपला 10 पैकी 1 जागा जिंकता आली. प्रभाग क्रमांक 4 ब मधून झालेल्या अटीटतीच्या लढतीत शैलेंद्र कत्रुवार यांनी राष्ट्रवादीच्या सुरेशचंद्र काबरा यांचा पराभव केला. शिवसेना उबाठा ने चार ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी प्रभाग क्रमांक 11 ब मधून युवासेना जिल्हाप्रमुख दिपक बारहाते यांनी भाजपच्या राजेश मंत्री यांचा तब्बल 1232 मतांनी पराभव केला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न देता दिपक बारहाते यांनाच अघोषित पाठिंबा दिला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 7 अ, 8 अ व ब या तीन ठिकाणी उमेदवार दिले होते. परंतु त्यांना 1 जागा देखील मिळाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT