Truck falls off flyover Manwat  Pudhari
परभणी

Manwat Accident | मिरच्यांनी भरलेला ट्रक मानवत येथील उड्डाणपुलावरून कोसळला; चालक जखमी

ट्रक चालक जखमी झाला असून सुदैवाने रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

पुढारी वृत्तसेवा

Truck falls off flyover Manwat Parbhani

मानवत : बीडहून परभणीकडे लाल मिरच्यांचा माल घेऊन जाणारा ट्रक मानवत शहरातील उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याची घटना मंगळवारी (दि. २१) पहाटे सुमारे पावणे पाचच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून सुदैवाने त्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव शेख तय्यब शेख महबूब (वय ४९, रा. बीड) असे आहे. तो ट्रक (क्रमांक एमएच २३ एयू ४३९९) मधून लाल मिरच्यांची वाहतूक करत परभणीकडे जात होता. मानवत येथील राष्ट्रीय महामार्गावरील के.के.एम. महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावरून जात असताना ट्रकचा ताबा सुटून तो डिव्हायडर ओलांडत खाली कोसळला.

अपघातानंतर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, अविनाश डंबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक देवा पेडगावकर यांच्या मदतीने जखमी चालकाला स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

अपघातांची मालिका सुरूच

मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर, विशेषतः मानवत–पाथरी आणि मानवत–परभणी मार्गांवर अपघातांची मालिका सुरूच आहे. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. सदर अपघात पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे त्या वेळी रस्त्यावर वाहतूक नव्हती, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या मार्गावर शाळा, महाविद्यालये तसेच निवासी वसाहती असल्याने दिवसभर येथे विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT