विकास लाडाने, संतोष चिलवंत Pudhari
परभणी

Parbhani Accident | मानवत तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

केकरजवळा येथे दुचाकीला चारचाकीची धडक; रत्नापूरमध्ये सायकलस्वाराचा बुलेटच्या धडकेत मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Manwat Accident News

मानवत : मानवत तालुक्यातील केकरजवळा आणि रत्नापूर येथे मंगळवारी (दि. २०) झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. केकरजवळा येथे दुचाकीला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने विकास भगवानराव लाडाने (वय ३८) यांचा मृत्यू झाला. तर रत्नापूर येथे सायकलवरून जात असताना बुलेटने धडक दिल्याने संतोष उत्तमराव चिलवंत (वय ५३) यांना प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

केकरजवळा येथे दुचाकीस्वाराचा मृत्यू

केकरजवळा येथील विकास भगवानराव लाडाने हे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पाथरी येथे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते दुचाकीवरून केकरजवळा गावाकडील शेतात जात होते. यावेळी गावाच्या शिवारातील चारीजवळ त्यांच्या दुचाकीला एमएच २२ एएम ७३७१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारचाकी वाहनातील एअरबॅगही फुटल्या.

या अपघातात विकास लाडाने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रत्नापूर येथे सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

दुसरी घटना रत्नापूर येथे मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. संतोष उत्तमराव चिलवंत हे रात्री जेवण करून सायकलवरून शेतातील आखाड्यावर झोपण्यासाठी जात होते. रत्नापूरजवळील टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पुलावर त्यांची सायकल आली असता, एमएच १४ एलसी १००० क्रमांकाच्या बुलेटने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

धडक बसल्याने चिलवंत हे सुमारे दहा ते पंधरा फूट उंच उडून रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दोन्ही अपघातांप्रकरणी बुधवारी (ता. २१) दुपारी चार वाजेपर्यंत मानवत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT