Manwat 17-year-old missing
मानवत : शहरातील जिजाऊ नगरातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेला एक 17 वर्षीय युवक गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेण्याची तक्रार मानवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मानवत शहरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.
उमेश रामराजे महाडिक (वय 17, रा. जिजाऊ नगर) हा रत्नापूर येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील रामराजे महाडिक हे शेतकरी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. सोमवारी (दि. 23) त्यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, 22 जून रविवारी कॉलेजला सुट्टी असल्याने उमेश सकाळी दहा वाजता त्याचे मित्राकडे जातो म्हणून घरातून निघून गेला. परंतु दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी दुपारी एक वाजल्यानंतर त्याच्या मोबाईलवर वीस ते पंचवीस वेळेस फोन लावले. तरीदेखील उमेशने फोन उचलले नाही. यानंतर घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी साडेपाच वाजता परत फोन लावला असता घरी दहा मिनिटात येतो, असे उमेशने सांगितले. परंतु एक तास झाला तरी उमेश घरी आला नसल्याने परत फोन लावला असता त्याचा मोबाईल बंद आला. यानंतर परत त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही.
या प्रकरणी रामराजे महाडिक (वय 46) यांनी मानवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश रामराजे महाडिक (वय 17, 9 महिने) या युवकाची उंची पाच फूट पाच इंच असून रंग गोरा आहे. अंगावर काळा रंगाचा चौकडा शर्ट व काळसर रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे.