Sugarcane Crop Fire Pudhari
परभणी

Parbhani Sugarcane Fire | माखणी शिवारात शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

शॉर्टसर्किटच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane Crop Fire

ताडकळस: शेतातील चार एकर उसाला आगीने घेरल्याची दुर्दैवी घटना पूर्णा तालुक्यातील माखणी शिवारात बुधवारी (दि.२८) दुपारी घडली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भारतीय लष्करातील जवान शिवराज ज्ञानोबा शिराळे यांचा तीन एकर, तर त्यांचे काका हनुमंत नारायण शिराळे यांचा एक एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून चार एकरांवरील ऊसपीक भस्मसात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जवान सीमेवर, शेतात आगीचे संकट

पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील रहिवासी असलेले जवान शिवराज शिराळे सध्या देशाच्या सीमेवर सेवा बजावत आहेत. माखणी शिवारातील गट क्रमांक ७५ मध्ये त्यांची शेती असून, त्यांनी नऊ एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली आहे. मात्र, बुधवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत त्यांच्या शेतातील तीन एकर ऊस जळून खाक झाला. त्याच परिसरात शेती असलेल्या त्यांचे काका हनुमंत शिराळे यांचाही एक एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

मोठ्या कष्टाने जोपासलेले ऊसपीक डोळ्यांदेखत जळून गेल्याने शिराळे कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी तत्परतेने प्रयत्न केल्याने आगीचा अधिक फैलाव रोखण्यास मदत झाली.

शॉर्टसर्किटच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत

पूर्णा तालुक्यात वीजवाहिन्यांमधील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वीजवाहिन्यांची नियमित देखभाल, धोकादायक ठिकाणांची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किटमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT