मानवत : येथील पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. के. एम. महाविद्यालयात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कनिष्ठ लिपिकाने कॅशियर पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या दुसऱ्या कनिष्ठ लिपिकास अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १८) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, के. के. एम. महाविद्यालयात सन २०१२ पासून कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले आणि सध्या कॅशियर पदाचा कार्यभार पाहणारे पी. एस. जोशी (वय ३९) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जोशी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी, १८ तारखेला ते नेहमीप्रमाणे शासकीय कामकाज करत होते. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास मुख्य लिपिक श्री. मोगरे त्यांच्या केबिनमध्ये आले आणि त्यांनी एका विद्यार्थ्याची टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) काढण्यासाठी अर्ज दिला.
जोशी हे कार्यालयीन नियमानुसार पावती तयार करत असताना, महाविद्यालयातील एमसीव्हीसी विभागातील कनिष्ठ लिपिक आर. डी. खांडेकर हे काहीही कारण नसताना जोशी यांच्या केबिनमध्ये आले. खांडेकर यांनी "पावती फाडायची नाही," असे म्हणत जोशी यांच्या हातातील विद्यार्थ्याचा अर्ज हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तर, त्यांनी जोशी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत डाव्या गालावर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून मानवत पोलिसांनी कनिष्ठ लिपिक आर. डी. खांडेकर यांच्या विरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. घोरपडे हे करत आहेत. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.