पूर्णा : तालुक्यातील माटेगाव ते आहेरवाडी रस्त्यावर असलेल्या कामाई नदी (ओढा) वरील पुलाच्या बांधकामावरून शेतकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्याांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेले पुलाचे बांधकाम नदीच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुध्द दिशेने होत असल्याचा आरोप शेतकरी गणपती नवनाथ बोबडे यांनी केला आहे.
माटेगाव-आहेरवाडी मार्गावरील गट क्र.21 मधील जमिनीजवळ हे काम सुरू आहे. पूर्वी ज्या दिशेने कामाई ओढ्याचे पाणी वाहत होते, त्याच नैसर्गिक दिशेने पुलाची रचना होणे अपेक्षित असताना सध्या वेगळ्याच दिशेने कॉलम उभारणी व काम सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास पाणी थेट शेतात शिरून पिकांसह जमिनीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली. शेतकरी गणपती बोबडे यांनी सार्वजनिक बांधकाम तसेच तहसीलकडे तक्रार दाखल केली असून, सुरू काम तातडीने थांबवून तांत्रिक दुरुस्ती करून पुलाची रचना नैसर्गिक प्रवाहानुसार सरळ रेषेत करावी, अशी मागणी केली.
अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा इशाराही दिला. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य बदल करावेत, अशी मागणी शेतकरी बोबडे यांनी केल. या वादामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, प्रशासनाने तांत्रिक बाबींचे सविस्तर स्पष्टीकरण देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आहेरवाडी रस्त्यावर पूलकाम हे नदीच्या अस्तित्वातील वक्राकार प्रवाहाचे सखोल सर्वेक्षण करूनच करण्यात येत आहे. पूर्वी असलेल्या नळकांडी पुलाच्या जागेवरच नवीन पूल उभारला जात असून, तांत्रिक आराखड्यानुसार काम सुरू आहे. नवीन आराखड्यानुसार पूल उंची वाढवून 5 गाळ्यांचा (स्पॅन) पूल उभारण्यात येत आहे. परिसरातील शेतजमिनींत पाणी शिरणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती वगळता कोणतीही हानी होणार नाही, असे बांधकामचे उपअभियंता संजय देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.