डॉक्‍टर-कर्मचार्‍यांचे जिल्‍हा रुग्‍णालयात चार तास कामबंद आंदोलन pudhari photo
परभणी

Parbhani News : डॉक्‍टर-कर्मचार्‍यांचे जिल्‍हा रुग्‍णालयात चार तास कामबंद आंदोलन

जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकाचे निलंबन रद्दची मागणी; आनंद भरोसे यांच्‍या आश्वासनानंतर आंदोलन तात्‍पुरते मागे

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिंतूर येथील गरोदर माता मृत्यू प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार यांच्यावर केलेल्या निलंबन कारवाईचे पडसाद शुक्रवारी (दि.14) जिल्हा रुग्णालयात उमटले. निलंबनाच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि.14) सकाळी 8 वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले.

तब्बल 4 तास आंदोलन सुरू होते. अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचार्‍यांशी चर्चा केली. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून मंगळवारी (दि.18) पर्यंत निलंबन रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

जिंतूर येथील गरोदर माता व तिच्या बाळाच्या मृत्यूच्या घटनेनंतर आरोग्य विभागाकडून प्रशासकीय पातळीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांना निलंबित केले. या कारवाईने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांत तीव्र नाराजी निर्माण झाली. निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजता कामबंद आंदोलन सुरू केले.

अचानक मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला. कर्मचार्‍यांनी निलंबनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी लावून धरली. आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचार्‍यांत निलंबनाच्या कारवाई विरोधात असलेला रोष आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्टपणे समोर आला.

दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच नानलपेठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक कदम यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालय परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित होते.

प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. त्यांनी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. डॉ.लखमावार यांच्या निलंबनाचा प्रश्न मंत्र्यांंच्या निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने चर्चा केली जाईल, असे सांगितले. तसेच, दि.18 ऑगस्टपर्यंत मंत्र्यांंशी चर्चा करून डॉ. लखमावार यांचे निलंबन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

यानंतर आंदोलनकर्त्या डॉक्टर व कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. चार तासांच्या कामबंद आंदोलनानंतर कर्मचार्‍यांनी तूर्त आंदोलन मागे घेतले असले तरी शासनाकडून 18 ऑगस्टपर्यंत काय निर्णय घेतला जातो, याकडे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले. निलंबन रद्द न झाल्यास पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली जाणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली. दरम्यान, रुग्णालयातील कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, आंदोलनामुळे निर्माण झालेला तणाव तूर्त शांत झाला. मात्र, डॉ. नागेश लखमावार यांच्या निलंबनाचा मुद्दा आगामी काही दिवसांत आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अधिष्ठाता यांना वारंवार फोन, ३ तासांनी आगमन

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे व रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी अधिष्ठाता डॉ.चव्हाण यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगत तातडीने जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहण्याची विनंती केली. यासाठी त्यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, बराच वेळ अधिष्ठात्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांत संतापाची भावना निर्माण झाली. अखेर तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर अधिष्ठाता चव्हाण रुग्णालयात दाखल झाले. मात्र, रुग्णालयात आल्यानंतरही आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांना निलंबनाच्या मुद्यावर कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने त्यांच्या संतापात आणखी भर पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT