परभणी : अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाकडून जिल्ह्यात कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलज येथे सुरू असलेल्या कथित पपलू जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि. १९) छापा टाकण्यात आला. या कारवाईत ३८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १३ लाख ८७ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भिलज येथील गजानन ज्ञानदेव गित्ते यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये पैसे लावून पपलू नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान काही जण पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली असता, ठाणे जिल्ह्यातील दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या परवान्याच्या नावाखाली पपलू जुगार खेळविला जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र, हा प्रकार गजानन गित्ते यांच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख २ हजार ४१० रुपयांची रोकड, ३३ मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन आणि १० मोटारसायकली असा एकूण १३ लाख ८७ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, प्रमोद जाधव, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने खबर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.