पूर्णा : तालुक्यातील आव्हई येथे मागील अनेक दिवसापासून ग्रामस्थांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरीकांना कायम शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी, शासनाने जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठा मंजूर केली. या योजनेतून एका गुत्तेदाराने विहीर खोदकाम, पाइपलाइन नळ कनेक्शन फिटींग करुन सदरील योजना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आली.
खोदण्यात आलेल्या विहिरींना पाणीसाठा देखील मुबलक असताना ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नळांना पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी, गावातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील नागरीक महिला यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करत फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने जलजीवन योजनेसाठी दिलेला निधी पाणी सोडले जात नसल्याने वाया गेला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान,या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे संपूर्ण काम पूर्ण होवूनही नळांना पाणी सोडण्यात यावे यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ता प्र गणेश बुचाले व त्यासह गावातील नागरीक लक्ष्मण बुचाले, सुदाम बुचाले, मनोहर बुचाले, गोपीनाथ बुचाले, नागोराव पवार, रावसाहेब बुचाले, गिज्ञानदेव पवार, संभाजी पवार, दिपक बुचाले, गोविंद बुचाले, सुभाष बुचाले, किशन बुचाले, राजेश, रमेश बुचाले यासह असंख्य नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना ७ मे रोजी निवेदन सादर करुन उपोषण व आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,आव्हई गावात जलजिवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा कामे पूर्ण झाली आहेत. तरीशुध्दा नळांना पाणी सोडले नसल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरी घेवून इतरत्र पाणी भरण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. दरम्यान, याविषयी दि.१३ मार्च देखील पं स गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून उपोषण संदर्भात कळवण्यात आले होते. त्यावेळी ग वि नारायण मिसाळ यांनी संबंधितांना त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत उपोषण करु दिले नव्हते. तरी देखील ग्रामपंचायतने आजवर कोणताही तोडगा न काढता पाणी सोडले नाही. त्याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचे उप अभियंता यांनी देखील दखल घेतली नाही.
उलट निवेदन कर्त्यांनाच उद्धट वागणूक दिली. त्यामुळे कंटाळून जावून गणेश बुचाले यांनी असंख्य नागरीकांचे स्वाक्षरचे जिल्हाधिकारी यांना मराठा नेते सुभाष जावळे यांच्या समक्ष निवेदन देत येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा चालू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
धरण उशाला अन् कोरड घशाला, या म्हणीचा येतोय प्रत्यय
दरम्यान, आव्हई गावात जलजीवन वन मिशन योजनेअंतर्गत संबंधित गुत्तेदाराने विहीर खोदकाम पाइपलाइन नळ कनेक्शन फिटींग करुन काम पूर्ण केले. सदरील योजना ग्रामपंचायतला हस्तांतरितही केली. तरी शुद्धा नळांना पाणी सोडले नाही. परीणामी नळ कोरडेठाक दिसून येत असून नळाजवळ चिमणीलाही प्यायला पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरील योजनेच्या दोन्ही विहरीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र ते पाणी नळांना सोडले जात नसल्याने "धरण उशाला अन् कोरड घशाला" या म्हणीचा प्रत्यय गावकऱ्यांना येत आहे.