Parbhani 54 villages irrigation project
मानवत : मानवत व परभणी तालुक्यातील ५४ गावे अद्यापही सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत. या गावांना पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी तीन महिन्यांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. या प्रश्नावर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी पुढाकार घेतला आहे.
आ. राजेश विटेकर यांनी या गावांच्या सिंचनाच्या प्रश्नावर वेळकाढू धोरण व प्रशासनातील दिरंगाई याबाबत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या मागणीवर मंत्री विखे पाटील यांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी संचालक यांना तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यावर या कामाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
गोदावरी व दुधना नदीच्या उंचवठा भागातील ही गावे असल्याने येथे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेती बागायती होऊ शकलेली नाही आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने लक्ष घालावे, अशी विनंती आ. विटेकर यांनी केली होती.
गोदावरी नदीच्या मुदगल ते खडका दरम्यान रामपुरी येथे, तसेच दुधना प्रकल्पावरील कुंभारी व कोथळा या तीन ठिकाणी बंधारे बांधण्याचा प्रस्ताव आहे. आंध्र प्रदेशात पुराचे पाणी वाहून जाते, त्यातील काही पाणी या बंधाऱ्यांमध्ये साठवता येईल. या उपाययोजनेमुळे रामपुरी, कुंभारी व कोथळा या बंधाऱ्यांत पाणी साठवून ५४ गावांचा पाणी प्रश्न सुटू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.