सेलू : तालुक्यातील देऊळगाव गात ते डासाळा हा महत्त्वाचा रस्ता लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी उखडून ठेवण्यात आला. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसल्याने वाहनधारक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
देऊळगाव गात ते डासाळा हा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करण्यात आला होता. जून २०२४ मध्ये या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. हा रस्ता दोन वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांना देण्यात आला असून संबंधित कंत्राटदारांकडून मागील अनेक महिन्यांपासून केवळ रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावरील खड्डे, मुरूम आणि उखडलेली अवस्था यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अनेक किरकोळ अपघात घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका आणखी वाढला आहे.
दरम्यान, येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून या मार्गावरील लाडनांद्रा, डासाळा, ब्राह्मणवाडी, खवणे पिंपरी, राधे धामणगाव, आष्टी, डोंगरगाव आणि नाथरा पाटी या गावांतील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी सेलू येथे ये-जा करतात. मात्र, रस्त्याचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पावसाळा तोंडावर असताना रस्त्याचे काम रखडल्यामुळे चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा फटका बसणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन आणि कंत्राटदारावर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनीही संबंधित प्रशासन व कंत्राटदारांनी देऊळगाव गात ते डासाळा रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.