Parbhani Illegal Sand Mining pudhari photo
परभणी

Parbhani Illegal Sand Mining : निलजमध्ये अवैध रेती उत्खननावर छापा; ३ टिप्पर, जेसीबी, ट्रॅक्टरसह १० ब्रास वाळू जप्त

पोलिस उपमहानिरीक्षकांच्‍या पथकाची कारवाई; ८७ लाखांवर मुद्देमाल जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

परभणी : नदीपात्रातून इंजिन बोटीच्या सहाय्याने बेकायदा रेती उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली. जिंतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निलज शिवारातील वाळू धक्क्यावर सोमवारी (दि.२) केलेल्या कारवाईत तीन टिप्पर, जेसीबी, ट्रॅक्टर, चाळणी तसेच नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली १० ब्रास वाळू असा एकूण ८७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परभणी जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध रेती उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पथक रवाना केले होते. या पथकाने निलज शिवारातील वाळू धक्क्यावर छापा टाकला असता, नदीपात्रातून इंजिन बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ती नदीकिनारी आणली जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रेती उपसा व वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने आणि साहित्य ताब्यात घेतले. या कारवाईत तीन टिप्पर, एक जेसीबी, ट्रॅक्टर, चाळणी आणि नदीपात्रातून उपसा करून किनारी साठवून ठेवलेली १० ब्रास वाळू असा ८७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोउपनि पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ. प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे, गजानन डवरे यांनी ही कारवाई केली. पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून खबर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या क्रमांकावर देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT