Parbhani news
परभणी : शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक वापरासाठी अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट तसेच हातगाडा चालकांवर जिल्हा प्रशासनाने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान एकूण ७३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार, जिल्हा पुरवठा विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी शहरातील तसेच तालुक्यांमधील हॉटेल, रेस्टॉरंट आणि हातगाड्यांवर अचानक धाडी टाकून तपासणी केली. काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणासाठी वापरात असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित ठिकाणांहून सिलेंडर जप्त करण्यात आले.
या कारवाईत परभणी शहर व तालुक्यातून २६, पाथरीतून ९, पूर्णा येथून १७, सेलू येथून ३, गंगाखेड येथून १५ आणि जिंतूर येथून ३, असे एकूण ७३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध पुढील काळातही धडक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी व्यावसायिक वापरासाठी केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरच वापरावेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांनी व्यापारासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर न करता व्यावसायिक सिलेंडरचा वापर व्यवहारासाठी करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करून घरगुती सिलेंडर जप्त करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिली.