चारठाणा: गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चारठाणा गावात जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गोरगरीब कुटुंबांची घरे कोसळली आहेत. १६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ही पडझड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पावसाळ्याच्या दिवसातच घराचे छत कोसळल्याने अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे. नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून जोर धरत आहे.
या अतिवृष्टीमुळे श्याम नानासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर भगवान सासनिक, जनार्दन रामलिंग आप्पा क्षीरसागर, संदीप चौधरी आणि उमाकांत इंगळे यांच्यासह अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.