Parbhani Bribe | खरबाचे ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात pudhari photo
परभणी

Parbhani Bribe | खरबाचे ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मृत्यू प्रमाणपत्रासाठी लाच घेणे पडले महागात

पुढारी वृत्तसेवा

परभणी : मानवत तालुक्यातील खरबा ग्रामपंचायत कार्यालयात लाच मागणी केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी रमेश रंगनाथराव मुळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ए.सी.बी.) परभणीच्या पथकाने सापळ्यात पकडले. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून ही सापळा कारवाई मंगळवारी (दि.4) पंचासमक्ष पार पडली.

सदर प्रकरणाची माहिती अशी की, तक्रारदाराची पत्नी दि. 22 फेब्रुवारी रोजी आजाराने मृत्यू पावली होती. मृत्यूची नोंद करून मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी तक्रारदाराने दि.23 ऑक्टोबर रोजी खरबा येथील ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात 500 रुपये मागितले. तक्रारदाराने नाईलाजास्तव ती रक्कम दिली.

मात्र, परत दि.28 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुन्हा 500 रुपये मागितले. हे मागणे तक्रारदारास लाचविषयक वाटले आणि त्यांनी दि.4 नोव्हेंबर रोजी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ए.सी.बी.चे उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारीची पडताळणी आणि सापळा कारवाई करण्यात आली. पंचासमक्ष कारवाई दरम्यान आरोपी ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांनी तक्रारदाराकडून 1 हजार रुपये स्वीकारले, ज्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले.

सध्या आरोपी ग्रामपंचायत अधिकारी यांची अंगझडती, कार्यालय व घरझडती प्रक्रिया सुरू असून मोबाईल तपासणीसाठी जप्तीची तजविज ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अंतर्गत पोलीस तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा कारवाईचे निरीक्षण पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी केले आणि तपास पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पवार यांच्याकडे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT