Parbhani Gangakhed farmers agitation
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी येथे जी–७ साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर करावा, तसेच उसाला प्रति टन पहिला हप्ता तीन हजार रुपये व अंतिम दर चार हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी ऊस उत्पादक व विविध संघटनांच्या वतीने गंगाखेड–परभणी राष्ट्रीय महामार्गावर साडेचार तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश चनखोरे यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीकांत भोसले, राजेश फड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहर वाव्हळे,भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव शेतकरी संघटनेचे बंडू सोळंके यांच्या सह एकूण ७५ जणांची नावे आहेत. तर १४ ते १५ इतरांचा समावेश आहे.
ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने यापूर्वी आंदोलनाबाबत पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने कलम १६८ अन्वये नोटीस बजावून रास्ता रोको न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी खळी पाटी येथे महामार्ग रोखून धरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या आंदोलनामुळे विद्यार्थी, रुग्ण, प्रवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गंगाखेड पोलिसांसह महसूल प्रशासन, अग्निशमन दल व इतर शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असे देखील तक्रारीत नोंद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगाखेड पोलिस करत आहेत.