Parbhani Crime: तत्कालीन सोनपेठ तहसीलदाराच्या अपसंपदेचा पर्दाफाश Pudhari
परभणी

Parbhani Crime: तत्कालीन सोनपेठ तहसीलदाराच्या अपसंपदेचा पर्दाफाश

ज्ञात उत्पन्नापेक्षा ८७ लाख ८४ हजारांची अधिक मालमत्ता; पत्नीचाही आरोपी म्हणून समावेश

पुढारी वृत्तसेवा

परभणी : सोनपेठ येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा तब्बल ८७ लाख ८४ हजार २८८ रुपयांची अधिक मालमत्ता संपादित केल्याच्या आरोपावरून तत्कालीन तहसीलदार तथा सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी योजना विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले आशिषकुमार बापुराव बिरादार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. ही कथित अपसंपदा त्यांच्या ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या ८१.९१ टक्के असल्याचे एसीबीच्या उघड चौकशीत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात बिरादार यांच्या पत्नी अपर्णा आशिषकुमार बिरादार यांनाही आरोपी करण्यात आले आहे. स्वतःच्या नावावर अपसंपदा संपादित करून पतीला कथित गुन्ह्यास मदत व प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १) रात्री ७.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील संबंधित तरतुदी तसेच २०१८ मधील सुधारित कायद्यातील तरतुदी आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, आरोपी लोकसेवकाच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

पूर्वीही सापळा कारवाई

आशिषकुमार बिरादार यांच्याविरुद्ध यापूर्वी एका तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने सापळा कारवाई केली होती. या कारवाईनंतर सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२१ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बिरादार यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादित केल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची स्वतंत्र उघड चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एसीबीने त्यांच्या आर्थिक व्यवहारांसह स्थावर व जंगम मालमत्तेची सविस्तर छाननी केली.

१४ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी

दि. ३ नोव्हेंबर २००७ ते ३ ऑगस्ट २०२१ या परीक्षण कालावधीतील बिरादार यांचे ज्ञात कायदेशीर उत्पन्न, विविध खर्च, स्थावर व जंगम मालमत्ता तसेच इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. या चौकशीत ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ८७,८४,२८८ रुपयांची अपसंपदा आढळून आल्याचा दावा एसीबीने केला आहे. ही रक्कम त्यांच्या ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या ८१.९१ टक्के असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे विभागाने सांगितले.

पत्नीचाही आर्थिक व्यवहार तपासाच्या कक्षेत

अपर्णा बिरादार यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्यांच्या नावावर कथित अपसंपदा आढळून आल्याने त्यांनी लोकसेवक असलेल्या पतीला कथित गैरव्यवहारासाठी मदत व प्रोत्साहन दिल्याचा आरोप एसीबीने केला आहे. त्यामुळे तपास आता बिरादार यांच्या मालमत्तेबरोबरच कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्ता आणि संबंधित आर्थिक व्यवहारांपर्यंत विस्तारला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी लोकसेवकाच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या झडतीत मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि कथित अपसंपदेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे किंवा अन्य पुरावे मिळतात का, याकडे तपास यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाची उघड चौकशी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी केली. चौकशीचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक किशोर तरोणे यांनी केले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी करीत आहेत. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. आश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारी घेऊन पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT