मानवत : तालुक्यातील इरळद ते वालुर या रस्त्यावर असलेल्या दुधना नदीच्या पुलावरील पुराच्या पाण्यात मध्यभागी अडकलेल्या दोन मोटरसायकल वरील पाच जणांची इरळद येथील युवकांनी आपल्या जीवाची बाजी लावून सुखरूप सुटका केल्याची थरारक घटना गुरुवारी ता 18 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. पुरात अडकलेल्यांचे प्राण वाचवल्याबद्दल सदरील धाडसी युवकांचा शुक्रवारी इरळद ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चित्रपटासारखी थरारक घटना
एखाद्या पिक्चर मध्ये अंगावर थरार आणणारी घटना घडावी तशी घटना मानवत तालुक्यातील इरळद येथील दुधना नदीच्या पुलावरील पुराच्या पाण्यात घडली. याबाबत माहिती अशी की, इरळद येथील माऊली धबडकर व त्यांच्या पत्नी सरस्वती धबडकर हे गुरुवारी ता 18 दुपारी पित्राचे जेवण करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकाकडे मोटर सायकलवर जिंतूर तालुक्यातील बोरी येथे गेले होते. त्यांना रात्री परत येण्यासाठी उशीर झाला. यावेळी वालूर ते इरळद या रस्त्यावर असलेल्या दुधना नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते.
रात्रीच्या अंधारात पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी गाडी पुरात पुलावर घातली. परंतु गाडी पुलाच्या मध्यभागी बंद पडल्याने अडकली. याचवेळी ताडबोरगाव येथील केशव गुंगाने, कपिल गुरव व एक अडीच वर्षाची मुलगी हे मोटरसायकल वरून याच पुलावर अडकले. याच वेळी योगायोगाने इरळद येथील केशव कचरे, सुरेश गायकवाड व रमेश ठाकूर हे तिघेजण पुराचे पाणी बघण्यासाठी पुलाजवळ आले होते. त्यांना एका महिलेच्या मदतीकरता ओरडण्याचा आवाज ऐकू आला. या तिघांनी जीवाची पर्वा न करता पुलावरील पुराच्या पाण्यात धाव घेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. यावेळी रमेश ठाकूर यांनी इरळद येथील सरपंच अशोक कचरे यांना फोनवरून सदरील घटनेची माहिती दिली. सरपंचांनी गावातील अंगद मोरे, रामा मुळे, संतोष मुळे, गजानन आळणे यांच्यासह 15 ते 20 जणांना सोबत घेऊन दुधना नदीकडे धाव घेत मानवी साखळी करीत दोन मोटरसायकल वरील एकूण पाच जणांना जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात वाचवले.