गंगाखेड : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात परिचित असलेल्या गंगाखेड येथील जनाबाई महाविद्यालयात दोन प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा सुरू असून नावाजलेल्या या महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. तर शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेले तत्कालीन प्राचार्य व आजचे संस्थाध्यक्ष हे यांच्यावर कार्यवाही करतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनाबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे तालुक्यातच नव्हे तर परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यात विद्यार्थी घडवणारे महाविद्यालय म्हणून परिचित आहे. या महाविद्यालयातील बरेच विद्यार्थी अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत. याच महाविद्यालयात 5 मार्च रोजी सकाळी 11 वा चहापान घेण्यासाठी प्राध्यापक मंडळी कॉलेज कँटीन मध्ये आले असताना दोन प्राध्यापकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्याच्यात हाणामारी झाली. याचा व्हिडीओ काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून ओळख असणाऱ्या या महाविद्यालयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.