पाथरी : मृग नक्षत्र संपत आले तरी तालुक्यात अद्याप पेरणी लायक पाऊस झाला नाही. मृग नक्षत्राच्या सुरुवातीस दोन-तीन वेळा अवकाळी सरी कोसळल्याने शेतकर्यांनी कापसाची लागवड आणि सोयाबीनची पेरणी केली. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे उगवलेली पिके सुकू लागली. पेरणी न झालेल्या शेतकर्यांमध्येही चिंता वाढल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील बहुतेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सुरुवातीच्या हलक्या सरींवर काहींनी कापसाची लागवड केली. काही ठिकाणी उगवणही झाली पण नंतर पाऊस न झाल्याने झाडे सुकण्यास सुरुवात झाली. तुटपुंज्या पाण्यावर पेरणी केलेले शेतकरी अडचणीत आले तर पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांची अजूनही पेरणी झालेली नाही. तालुक्यातील तुरा गावातील शेतकरी दत्तराव मोरे यांनी सुरुवातीलाच 8 बॅग कापसाची लागवड केली. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे उगवणच झाली नाही. यामुळे हे बियाणे वाया गेले असून अशा प्रकारच्या अनेक घटना तालुक्यात घडत असून शेतकर्यांत नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. मे महिन्यात काहीकाळ सुरू असलेले पैठण येथील नाथसागराच्या डाव्या कालव्याचे आवर्तन थांबविले गेले.
या कालव्या लगतच्या गावातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या होत्या पण आता कालवा कोरडा पडल्यामुळे त्या शेतजमिनींवरही पेरणी अडचणीत आली. नाथसागरात पाण्याची काहीशी आवक सुरू असली तरी पाणी लवकर सोडण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे. पाऊस कधी येणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होणार असल्याने आर्थिक संकट अधिकच वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी देवांकडे साकडे घालताना दिसत आहेत. तालुक्यात लवकरात लवकर पेरणीयोग्य पाऊस पडावा आणि नाथसागरातून आवर्तन सुरू व्हावे, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे.