परभणी

पूर्णेत टारगेट पूर्णतेमुळे हरबरा खरेदी बंद; शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध शेतकरी आक्रमक

Parbhani news |नवीन आदेश येईल तेव्हा वंचित शेतकऱ्यांचा हरबरा खरेदी करु; प्रशासनाचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

आनंद ढोणे

पूर्णा : येथील पूर्णा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला यंदाच्या रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचा उत्पादीत हमीभावात हरबरा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदरील केंद्रावर हरबरा खरेदी करण्यासाठी बारदाना उपलब्ध करुन दिलाच नसताना आता नुकतेच टार्गेट पूर्ण झालेय.

हरबरा खरेदी बंद करा, अशा सूचना प्राप्त झाल्याने वंचित शेतकऱ्यांनी पांगरा रोडवरील सहकारी हरबरा खरेदी केंद्रावर ता २५ एप्रिल रोजी चांगलाच राडा घातला. राज्य शासनाने सुरुवातीपासून शेतकरी उत्पादक कंपन्यांना नियमित बारदाना उपलब्ध करुन दिला. परंतु, या व्यतिरिक्त एकमेव असलेल्या सहकारी खरेदी विक्री संघाअंतर्गतच्या खरेदी केंद्रासोबत दुजाभाव करत सहकार क्षेत्र मोडीत काढण्याच्या उद्देशाने केवळ ९ दिवसच पुरेल एवढाच बारदाना दिला.

खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापूराव पाटील घाटोळ यांनी वारंवार सबंधीत खात्याचे अधिकारी, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे लेखी व तोंडी विनंती करुन बारदाना उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र,बारदाना उपलब्ध करुन दिलाच नाही. परिणामी, आजतागायत तब्बल ११० दिवस सदरील हरबरा खरेदी केंद्र बंद ठेवावे लागले. येथील खरेदी विक्री संघाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर हरबरा विक्रीसाठी सुमारे ४५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील केवळ १०० नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हरबरा खरेदी करण्यात आला.उर्वरित ३५० नोंदणी केलेले शेतकरी अजूनही वंचित आहेत. ते वेळोवेळी खरेदी केंद्रावर येवून आमचा हरबरा मोजून खरेदी करा, तुमच्याकडे बारदाना आहे की नाही? याचे आम्हाला काही संबंध नाही, तुम्ही नोंदणी का करुन घेतली? अशा नानाविध प्रश्नांना भडीमार करुन आक्रमक शेतकऱ्यांनी ता २५ एप्रिल रोजी खरेदी केंद्रावर चेअरमन घाटोळ यांना घेराव घालून परेशान केले.

परंतु, आता टारगेट पूर्ण झाले हरबरा खरेदी बंद करा जेव्हा नवीन आदेश येईल तेव्हा वंचित शेतकऱ्यांचा हरबरा खरेदी करु, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संकेत दिले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. आम्हाला अनेक दिवस वेठीस धरुन हरबरा घेतला नाही आणि आता तर सरकारने टार्गेट पूर्ण झाले म्हणून चक्क खरेदीच बंद केल्याचे सांगितले जात आहे. हा कुठला न्याय आहे. हे सरकार सहकर क्षेत्र मोडीत काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.

हरबरा खरेदीपासून वंचित राहीलेले शेतकरी सरकार विरुद्ध आंदोलन उभे करणार असल्याचे समजते. एकीकडे खासगी शेतकरी उत्पादक कंपन्यांना सातत्याने मुबलक प्रमाणात बारदाना उपलब्ध करून दिला. त्यांच्याकडील नोंदणीकृत शेतकऱ्यांचे टार्गेट पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे पूर्णा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्राला मात्र बारदाना मिळाला नसल्याने मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यांचे टार्गेट अद्याप पूर्ण झालेले नसताना खरेदी बंद करण्याचे आदेश येवून धडकल्याने खरेदी विक्री संघ आर्थिक डबघाईस आला असून नोंदणीकृत वंचित शेतकऱ्यांच्या खरेदी अभावी शिल्लक असलेल्या हरब-याचे करायचे काय?अ सा यक्षप्रश्न पडला आहे. हे आक्रमक झालेले शेतकरी आता सरकारच्या तोंडावर हरबरा फेकून मारण्याच्या तयारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT