Purna-Tadkals road Chakka Jam Farmer agitation,
पूर्णा: शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि दिव्यांग-विधवा महिलांना मानधन या रखडलेल्या मागण्यांसाठी पूर्णा-ताडकळस रोडवरील टी पॉईंट कॉर्नरवर आज (दि.२४) सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मागील चार दिवसांपासून शिवहार सोनटक्के, नरेश जोगदंड, मुंजाजी जोगदंड, विष्णू बोकारे यांसारख्या शेतकरी नेत्यांनी गावोगावी जाऊन बैठका घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली होती. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. माजी मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी सरकारला कर्जमाफीसाठी ठाम इशारा दिला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते.
आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाची लाट उसळली असून, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.