पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: धनगर टाकळी येथील एका शेतकऱ्याने महावितरण उपविभाग कार्यालयात शेतातील कृषी पंपासाठी कोटेशन भरुन वीज कनेक्शन जोडून देण्यासाठी अनेकवेळा विनंती केली होती. तरीही वीज कनेक्शन न मिळाल्याने कंटाळून अखेर शेतकऱ्याने आज (दि.२४) पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली.
पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील अल्पभूधारक शेतकरी रघुनाथ दत्तराव रोडगे यांची गंगाजीबापू परिसरात शेती आहे. त्यांनी गोदावरी नदीवरुन पाईप लाईन करुन घेतली आहे. त्यासाठी त्यांना रोहित्रा नजीकच्या एल टी लाईन विद्युत खांबावरुन कृषी पंपासाठी वीज कनेक्शन घेण्यासाठी महावितरणकडे रितसर कोटेशन भरले आहे. तेव्हापासून ते वारंवार महावितरण उपविभाग पूर्णा कार्यालयात चकरा मारत आहेत. तरीही वीजजोडणी मिळालेली नाही. अखेर त्यांनी आजपासून आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, महावितरणचे उपअभियंता रामगीरवार यांनी ग्रामीण अभियंता प्रितम वसमतकर यांना कनेक्शन जोडण्य़ाच्या सुचना दिल्या आहेत. वीज कनेक्शन जोडून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्षात कनेक्शन जोडून देत नाहीत. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आहे.