परभणी : शहरात प्रसिध्द कदम पोहेवाले या नावाने परिचीत व्यवसायिक परमेश्वर शामराव कदम यांनी रविवारी (दि.२७) दुपारी ३ वाजता वसमत रोडवरील त्यांच्या हॉटेलमध्ये दोरीने गळफास घेवून जीवन संपवले. त्यांनी नेमका गळफास का घेतला यामागील कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.
परभणी शहरातील वसमत रोडवर संजीवनी पोहे सेंटर या नावाचे प्रसिध्द हॉटेल आहे. परमेश्वर शामराव कदम (वय ६०, रा.आचार्य नगर) हे त्याचे मालक आहेत. दिवसभर हॉटेलमध्ये चहा, पोह्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मितभाषी असलेले परमेश्वर कदम हे सदरील व्यवसायामुळे सर्वांच्या ओळखीचे झालेले होते. रविवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास परमेश्वर शामराव कदम यांनी आपल्या संजीवनी पोहे सेंटर येथे गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. नेमका त्यांनी गळफास का घेतला याचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या नागरिकांमध्ये परमेश्वर कदम हे काही दिवसापासून मानसिक तणावाखाली होते अशी चर्चा सुरु होती.