परभणी : शेतकऱ्यांनो स्वतःला एकटे समजू नका, शासन तुमच्यासोबत आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला.
शनिवारी (दि.२६) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव, परभणी -गंगाखेड रोडवरील दैठणा येथे शेतकरी शेषराव गायकवाड यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी दैठणा येथील पुरुष व महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समवेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर, माजी आ.विजय भांबळे, आ.विक्रम काळे, विलास बाबर, भावनाताई नखाते, नगरसेवक अक्षय देशमुख व पदाधिकारी - कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी महिला शेतकऱ्यांशीही संवाद साधला. मराठवाड्यात दुष्काळाने भीषण परिस्थिती असून शेतकऱ्यांनी स्वतःला एकटे समजू नये, सरकार तुमच्यासोबत आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.
दुष्काळाच्या आवश्यक उपाययोजनांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्नही सोडविल्या जातील असे त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांची विशेषतः महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या वेदनांची मलाही जाणीव आहे
मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि वेदनेची जाणीव असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाथरी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना दिली. त्यांनी बाळासाहेब मारोतराव नाईक यांच्या शेतात भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
दुष्काळात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा समावेश
शनिवारी राज्य शासनाने राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील 9 ही तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळा नंतरच्या उपाययोजना करण्यास सुरुवात होणार असल्याचे दिसून येते.