पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा – ताडकळस मार्गावरील बॉम्बे पुलावरुन गट्टू भरुन जाणारा आयशर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने कोसळला. ही घटना रविवारी (दि.१७) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या अपघातात चालक रंगनाथ श्रीपती रोडगे (वय ३५, रा. महागाव, ता. पूर्णा) याच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर भगवान तुकाराम वाघमारे (वय ३१, रा. अजदापूर, ता. पूर्णा) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील पूर्णा- ताडकळस मुख्य रस्त्यावर असलेल्या बॉम्बे पुलावरुन पूर्णेहून ताडकळसकडे गट्टू भरुन जाणारा ट्रक (एम एच १४, डी एम ९३५२) चालकाचा ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळला. यावेळी पुलावरील चढाच्या डाव्या बाजूचे लोखंडी कठडे तोडून ट्रक कोसळला. बॉम्बे पूलाजवळील मार्ग हा चढ उताराचा आणि वळणाचा आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. या ठिकाणी अनेक वेळा मोटार अपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.
या अपघाताची नोंद पूर्णा पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेमुळे महागाव गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा