कायदा व सुव्यवस्थेसाठी परभणी जिल्ह्यात कलम १६३ लागू Pudhari photo
परभणी

कायदा व सुव्यवस्थेसाठी परभणी जिल्ह्यात कलम १६३ लागू

पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध

पुढारी वृत्तसेवा

परभणी : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याची घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी शहर व जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने मंगळवारी सायंकाळी नुकसान केल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जिल्ह्यात कलम ३७ (१) (३) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू असूनही या आदेशास न जुमानता आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नागरिक एकत्र जमा होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिक गटा-गटाने एकत्र येत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील कालावधीत शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होवू नये, यासाठी सदर आदेश देण्यात आले आहेत असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी गावडे यांनी केले.

हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत. हे आदेश बुधवारी (दि.११) दुपारी १ वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील असे कळविण्यात आले. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करण्याचेही आदेशात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नमूद केले आहे.

इंटरनेट सेवा बंद

आदेशान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार परभणी शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके, इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT