Parbhani District Central Cooperative Bank 
परभणी

Parbhani District bank election | दिग्गजांचा मार्ग मोकळा, कार्यकर्त्यांचा प्रवास खडतर; परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रंगणार

दिग्गजांचा मार्ग मोकळा, कार्यकर्त्यांचा प्रवास खडतर, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रंगणार

पुढारी वृत्तसेवा

Parbhani District Central Cooperative Bank election

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दि. १९ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा बिनविरोध निवडून आल्यामुळे मार्ग मोकळा झाला असला तरी निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रवास खडतर असल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही पॅनलकडून धनिकांना बँकेत प्रवेश मिळेल असे चित्र आहे. दि. ९ जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. परभणी- हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आजतागायत प्रस्थापितांचेच वर्चस्व राहिले आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला अनेक वेळेला उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक मोठी संस्था म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. लोकप्रतिनिधींना आपले राजकारण पुढे चालवण्यासाठी या बँकेची मोठ्या प्रमाणात मदत होते. यामुळे आमदार- खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींनाही बँकेचे संचालकपद मिळवण्याचा मोह सुटत नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मात्र पदरी निराशा आल्याचे अनेक वेळेला दिसून आले आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागा निवडून द्यावयाच्या असून त्यापैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये बँकेचे विद्यमान चेअरमन माजी आ. सुरेश वरपूडकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, तुषार दुधाटे हे ५ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी जिल्हा बँकेची होणारी निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र आहे.

माजी आ. सुरेश वरपूडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर हे आजघडीला एकाच पक्षात असल्यामुळे ते एकत्रितपणे लढणार काय? की आपला स्वतंत्रपणे मार्ग निवडणार हेही येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. एकंदरीत जिल्हा बँकेच्या माध्यमातू जिल्हाभर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह बँकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकी दिग्गजांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असला तर कार्यकर्त्यांना मात्र बँकेत प्रवेश मिळवण्यासाठी संघ करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

उमेदवारी माघारीसाठी दबाव

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आजतागायत नेते आणि त्यांच्या वारसदारांना निवडणुकीच्या माध्यमातून सहजच प्रवेश मिळाला आहे. आतापर्यंत प्रस्थापितांचा जिल्हा बँकेवर वरचष्मा राहिला असून आपल्या विरोधात त्रासदायक ठरू पाहणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी माघारीसाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे. एकंदरीत बँकेच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित त्यांना अडचणीचे ठरू पाहणाऱ्या उमेदवारांना लक्ष्मीदर्शन घडवून माघारीसाठी प्रवर्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT