पाऊस  File Photo
परभणी

Parbhani Rain | परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : ढगफुटी, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझीम

जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Heavy Rainfall in Parbhani

परभणी : जिल्ह्यात दि.21 व 22 जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले, अनेक ठिकाणी ढगफुटी व अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, तर चार मंडळांमध्ये ढगफुटी, आणि चार ठिकाणी अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, पालम तालुक्याला मात्र समाधानकारक पावसापासून यंदाही हुलकावणी मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात सर्वाधिक 215 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी ढगफुटी मानली जाते. याशिवाय हादगाव मंडळात 106 मिमी, सोनपेठ मंडळात 136 मिमी, जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेली मंडळात बाभळगाव (ता.पाथरी) - 98 मिमी, मोरेगाव (ता.सेलू) - 79.3 मिमी, चिकलठाणा मंडळ (ता.सेलू) - 87.8 मिमी, केकरजवळा (ता.मानवत) - 98 मिमी यांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मुसळधार पावसाचा जोर राहिला.

यात परभणी तालुक्यातील परभणी, जांब, झरी, शिंगणापूर, टाकळी कुंभकर्ण, पाथरी तालुका: पाथरी, जिंतूर तालुका: बामणी, चारठाणा, वाघी धानोरा, दुधगाव, पूर्णा तालुका: ताडकळस, लिमला, चुडावा, सेलू तालुका: सेलू, देऊळगाव, वालूर, मोरेगाव, सोनपेठ तालुका: आवलगाव, शेळगाव, वडगाव, मानवत तालुका: मानवत, रामपुरी या मंडळाला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले. या भागांत काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून, रस्तेही काही ठिकाणी बंद झाले आहेत.

पालम तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालम तालुक्याला पावसाने दुजाभाव देत रिमझीम हजेरी लावली. जिल्ह्यातील इतर भाग झोडपले जात असताना, पालममधील सर्वच महसूल मंडळांमध्ये 10 मिमीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, जमिनी वाळलेलीच आहेत. खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल नसल्याने पिके संकटात सापडली आहेत.

अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या संकटांची पाहणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या पथकाला तातडीने पाठवावे, अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे, पालम तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी कृत्रिम पावसाचा विचार किंवा सौर ऊर्जा पंप, पाणी टंचाई योजना लागू कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT