परभणी

Parbhani deer accident | अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी, वन विभागाची उदासीनता!

नागरिकांच्या जागरुकतेमुळे काळवीटाचे वाचले प्राण

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : नांदेड-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चारठाणा-पिंपरी गीते सीमेवर अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीट गंभीर जखमी झाले. मात्र पशुप्रेमी पोलीस व जागरूक नागरिकांच्या तत्परतेमुळे या काळवीटाचे प्राण वाचले. वन विभागाच्या उदासीन कारभाराचा मात्र यावेळी प्रत्यय आला.

दि 2 जुलै रोज गुरुवार रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चारठाणा येथून तीन किमी अंतरावर पिंपरी गीते सीमेवर अज्ञात वाहनाने काळवीटाला धडक दिली. अपघातात काळवीट रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले. त्याचवेळी कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी चव्हाण, येथील शेतकरी भागवत अंभोरे, भागवत गीते आणि प्रभाकर कुऱ्हे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यापासून काळवीटाची सुटका करून त्याला सुरक्षित केले.

पशुवैद्यकीय दवाखाना व वन विभागाची उदासीनता

जखमी काळवीटावर उपचार करण्यासाठी नागरिकांनी प्रथम चारठाणा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधला. मात्र तेथे एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यानंतर जिंतूर येथील वन विभागाचे जाधव व बुचाले यांच्याशी संपर्क साधला असता, "आम्ही मीटिंगसाठी बाहेर आहोत, गाडी घेऊन तात्काळ येतो" असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र दोन तास उलटूनही वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. दरम्यान, वन मजूर पांडुरंग वाघ हे घटनास्थळी दाखल झाले. अखेर नागरिकांनीच जखमी काळवीटाला वाहनातून हलवून चारठाणा पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.

एकीकडे पशुप्रेमी नागरिक आणि पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले. तर दुसरीकडे पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास वन्यप्राण्यांचे प्राण जाऊ शकतात. याबत वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT