Tadkalas illegal weapon possession
ताडकळस : माखणी (ता. पूर्णा) येथील तरुणाविरोधात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ताडकळस येथील मोंढा परिसरात पोलीस गस्त सुरू असताना सुदर्शन बाळासाहेब आवरगंड (वय २३, रा. माखनी, ता. पूर्णा, जि. परभणी) हा तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडे विना परवाना प्रतिबंधित शस्त्र असलेली तलवार मिळून आली.
सदर तलवार स्टील रंगाची असून तिला लाल रंगाचे म्यान आहे. एकूण लांबी सुमारे ३४.५ इंच इतकी असून जिल्हाधिकारी परभणी यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून ती बाळगल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल सत्यभान वडमारे (वय ३८, ताडकळस पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पडोळे करत आहेत.