मानवत : मानवत तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून हातामध्ये तलवार लोखंडी राड लाकडी काठ्या मिरची पावडर चा वापर करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तीन जणांना गंभीर जखमी केल्याबद्दल एकूण सात जणाविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत गजानन रमेश पाथरकर वय 33 फिर्याद दिली की, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी त्यांचे व त्यांच्या गावातील कृष्णा मगर अजय मगर गोपाळ मगर यांचे सोबत गोगलगाव पाटी येथे गाडी लावण्याचा कारणावरून वाद झाला होता. याप्रकरणी सेलू पोलीस स्टेशन येथे दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी ता 4 रात्री नऊच्या सुमारास गजानन पाथरकर हे मानवत येथून गोगलगाव कडे जात असताना कृष्णा मगर याने फोन करून बोलवून घेतले. त्यामुळे गजानन पाथरकर त्यांचा मोठा भाऊ केशव पाथरकर व चुलते विष्णू पाथरकर हे जिल्हा शाळेत जिल्हा परिषद शाळे समोर आले असता गोपाळ मगर, अजय मगर, कृष्णा मगर, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर व मनकर्णाची मुलगी सीमा ह्यांनी अडवले.
त्यांच्या हातामध्ये तलवार लोखंडी रॉड व लाकडी काठ्या होत्या. कृष्णा मगर आणि त्याच्या हातातील तलवारीने विष्णू पाथरकर यांचे डोक्यात वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन खाली पडले. त्यास उचलण्यासाठी गेलेल्या केशव व विष्णू यांच्या डोळ्यात मनकर्णा व सीमा यांनी मिरची पूड टाकली. त्यानंतर गोपाळ अजय व नवनाथ यांनी हातातील तलवार व लोखंडी रोडने केशव याच्या डोक्यात वार केला. यावेळी फिर्यादी गजानन यांचे आई कुशावरचा बाई यांना देखील संबंधित दोन महिलांनी मारहाण केली.
या मारहाणीच्या घटनेत तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गजानन पाथरकर यांच्या फिर्यादीवरून एकूण सात जणाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे करीत असल्याची माहिती प्रमोद देवकते यांनी दिली