गंगाखेड : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील तब्बल दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. ८ ऑगस्ट च्या पहाटे पाचच्या सुमारास शहरातील मुख्य बाजार पेठेतील रस्त्यावरा घडली. या घटनेमुळे पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेश्मा बालाजी गुंडाळे या नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शहरातील मुख्य बाजारपेठेतील असणाऱ्या भगवती देवी मंदिर परिसरात दर्शन घेतल्यानंतर त्या मॉर्निंग वॉक साठी सकाळी मुख्य रस्त्याने जात असताना मास्क घातलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अचानक अडविले.चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत रेश्मा गुंडाळे यांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर तिन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रेश्मा गुंडाळे घाबरून गेल्या. दरम्यान, लुटीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी मास्क घातलेला असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पहाटेच्या वेळी शहरातील विविध भागांत महिला व नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. अशा वेळी निर्जन अथवा कमी वर्दळीच्या रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणाऱ्या टोळीचा तातडीने छडा लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी रेश्मा गुंडाळे यांच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.