परभणी/जिंतूर : तालुक्यातील भोगाव देवी संस्थान परिसरातील इटोली शिवारात १८ वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली. जलद तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून पथकामध्ये ९ अधिकारी आणि १७ अंमलदार नेमण्यात आले आहेत.
याप्रकरणी सहा आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली असून, पोलिसांनी तत्काळ तपास करून १९ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यानंतर जिंतूर पोलिसांनी धडक कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींना रविवारी (दि.२०) परभणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी करण मोहिते याला सातारा जिल्ह्यातील तासगाव येथून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या गांभीर्याची दखल घेत तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिंतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देत जलद हालचाली केल्या. विशेष म्हणजे, तक्रार येण्यापूर्वीच संशयितांचा मागोवा घेऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांनी देखील प्रतिक्रिया नोंदवत पीडितेला न्याय मिळावा यासाठी सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे.
सामुहिक अत्याचार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी अशा प्रकारचे इतरही गुन्हे केले असतील, असा संशय पोलिसांना आहे. पिडीतांनी न घाबरता पोलिसांसमोर येऊन माहिती द्यावी. पिडीतांचे नाव गोपणीय ठेवण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.