Parbhani Crime | फेक पत्ता जुगार अड्ड्यावर छापा ; 23.22 लाखांचा मुद्देमाल जप्त  
परभणी

Parbhani Crime | फेक पत्ता जुगार अड्ड्यावर छापा ; 23.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

बोरगाव शिवारात कारवाई ; 12 जणांविरुद्ध गुन्हा, काही जण पसार

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यातील अवैध धंदे आणि जुगार अड्ड्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला वेग आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.15) पहाटे सेलू तालुक्यातील बोरगाव शिवारात धडक कारवाई करत पत्त्यावर पैशांची पैज लावून फेक पत्ता नावाचा जुगार खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहनांसह तब्बल 23 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांची चाहूल लागताच पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात अवैध दारू, मटका, जुगार तसेच इतर अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अवैध धंद्यांची माहिती संकलित करून अचानक छापे टाकण्यात येत आहेत. याच मोहिमेदरम्यान बोरगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दि.15 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 2.06 वाजता बोरगाव शिवारातील लहाने यांच्या शेतापासून सुमारे चार किमी अंतरावरील ठिकाणी काही इसम पत्त्यावर पैसे लावून फेक पत्ता नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी धडक दिली. पोलिसांचे पथक अचानक घटनास्थळी दाखल होताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये धावपळ उडाली.

काही इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काहींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता जुगारासाठी वापरली जाणारी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहने आढळून आली. कारवाई दरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह एकूण 23 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालामुळे या जुगार अड्ड्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. या ठिकाणी जुगारासाठी नेमकी किती रक्कम वापरली जात होती, तसेच या अड्ड्याचे संचालन कोण करत होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पसार झाल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

पसार झालेल्या इसमांची ओळख पटविण्यासह त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. जप्त वाहने कोणाच्या मालकीची आहेत, जुगाराच्या अड्ड्यावर त्यांचा वापर कशासाठी केला आणि या जुगार अड्ड्याच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचीही चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, अंमलदार रामकिशन काळे, गोवर्धन वड, देवदास बुकरे, मुकेश बुधवंत, तुपसुंदर, नामदेव चौरे, उमेश चव्हाण आणि आरसीपीच्या जवानांनी केली.

जालना, परभणी जिल्ह्यातील आरोपी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बाबूराव खंदारे (वय 42, मंठा), विजय विठलराव पाटोळे (वय 39, परतूर), राजाभाऊ अश्रोबा सावंत (वय 50, मानवत), सतीष उत्तमराव ठोंबरे (वय 35, टाकळी रंगोपंत, ता. परतूर), ज्ञानोबा विश्वनाथ ठोंबरे (वय 63, टाकळी रंगोपंत, ता. परतूर), विठल सुदामराव जाधव (वय 35, आहेर बोरगाव, ता. सेलू), नामदेव महादेव पुंगळे (वय 30, आहेर बोरगाव, ता. सेलू), नितीन मुरलीधर शर्मा (वय 47, सेलू), सुधाकर प्रभाकर बारहाते (वय 54, मानवत), बाशीद कालू कुरेशी (वय 32, मंठा), सिध्दीकी इमाम खाटीक (वय 36, मंठा) आणि चंदु आकात (सातोना, ता. परतूर) यांचा प्रकरणात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT