मानवत : शहरातील अत्यंत गजबजलेल्या क्रांती चौक परिसरात एका ज्येष्ठ व्यापाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
वासुदेव दत्तात्रय बाकळे (वय ७१) यांच्या घरात ही धाडसी चोरी झाली असून, या प्रकरणी शनिवारी (१४ मार्च) रात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर चार दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने आणि चोरीच्या रकमेत मोठी तफावत दाखवण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव बाकळे आणि त्यांची पत्नी मेघा १ मार्च रोजी आपला मुलगा प्रतीक याला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. होळी आणि रंगपंचमीचा सण असल्याने ते मुलाकडेच थांबले होते. १० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या फुलारी यांनी बाकळे यांना फोन करून घर उघडे असल्याचे कळवले. बाकळे यांनी तातडीने आपला पुतण्या अजिंक्य याला घरी पाठवले. अजिंक्यने पाहिले असता, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि आतील कपाटाचा कडा तोडलेला होता. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. ११ मार्च रोजी सकाळी बाकळे कुटुंबीय पुण्यातून मानवतला परतले. तेव्हा कपाटातील तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घरफोडी प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरीला गेलेल्या मालाची किंमत. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे १५ तोळे सोन्याची किंमत सुमारे २२ लाख ५० हजार रुपये आहे. मात्र, पोलिसांनी फिर्यादीत हे दागिने जुन्या खरेदी भावाप्रमाणे दाखवले आहेत. त्यामुळे कागदोपत्री चोरीची रक्कम केवळ २ लाख ९२ हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. दागिने खरेदीच्या पावत्या उपलब्ध नसल्याने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांचा विलंब झाल्याचे बोलले जात आहे.
सोन्याच्या पाटल्या (५ तोळे): ६० हजार रुपये (जुन्या भावाप्रमाणे)
सोन्याचे गंठण (६ तोळे): ७२ हजार रुपये
सोन्याचे लॉकेट (२ तोळे): ८० हजार रुपये
सोन्याच्या अंगठ्या व रिंग (२ तोळे): ८० हजार रुपये
भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे मानवत शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर करत असून, चोरटे अद्याप मोकाट आहेत.