बोरी प्रतिनिधी : बोरी शहरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात बोरी पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विविध प्रकारचा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ आणि एक मोबाईल असा एकूण २७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बोरी शहरातील एका पानशॉपच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी शेख साजिद शेख मोहम्मद (वय ३९, रा. रामनगर, बोरी) याच्याकडे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
जप्त मुद्देमालामध्ये विविध कंपन्यांचे पानमसाले, सुगंधित तंबाखू, गुटखा तसेच पिवळ्या व सिल्वर प्रकारातील तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत २७ हजार ८४० रुपये असल्याचे नमूद केले आहे. तसेच आरोपीकडील एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई बोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत आडके करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बोरी शहर व परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा प्रकारची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बोरीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्या खुलेआम चालू.
बोरी शहरात अनेक पानटपऱ्यांवर तंबाखूयुक्त पदार्थ, सुगंधित सुपारी आणि इतर घटक एकत्र करून गुटख्यासारखे मिश्रण तयार केले जाते. या मिश्रणाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही विविध नावांनी आणि वेगवेगळ्या स्वरूपात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही पानटपरी चालक तंबाखू, सुपारी व इतर पदार्थ एकत्र करून ग्राहकांना तयार मिश्रण स्वरूपात देतात. यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तोंडाचा कर्करोग, दात व हिरड्यांचे आजार तसेच इतर गंभीर व्याधींचा धोका वाढत असल्याबाबत आरोग्य तज्ज्ञ सातत्याने इशारा देत आहेत.
दरम्यान, अचानक बंद झालेल्या पानटपऱ्या परत चालू झाल्याचे चित्र बोरी शहरात दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने , व बोरी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बोरी परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी संबंधित विभागांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.