परभणी : जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी एका मोठ्या कारवाईत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. स्वतःच्याच सहकाऱ्याकडून पदोन्नतीचे 'बक्षीस' म्हणून लाच मागणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या माहितीनुसार, त्यांना दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पलटण नायक पदाची पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, या पदोन्नतीसाठी होमगार्ड अधिकाऱ्यांनी बक्षीस म्हणून २५ हजार रुपये मागितले. यापैकी ८ हजार रुपये तक्रारदाराने फोन पे द्वारे वरिष्ठ पलटन नायक ज्ञानोबा लटपटे यांना दिले आणि उर्वरित रक्कम मागितली. सदरील उर्वरित रक्कम तक्रारदाराकडून सोमवारी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील केंद्रनायक नानासाहेब गणपतराव मोखडे, प्रशासिक अधिकारी माणिक शंकरराव वाडेकर, वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा बाबुराव लटपटे यांनी स्वीकारली.
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी जगदंबा हॉटेल, जिंतूर रोड, परभणी येथे केलेल्या पडताळणीत आरोपींनी सुरुवातीला २५ हजार रुपये मागण्याची कबुली दिली. तडजोडीनंतर १२ हजार रुपये स्वीकारले जाण्याची माहिती मिळाली. याच प्रकरणी दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल रायबा, जिंतूर रोड, परभणी येथे सापळा कारवाईत वरिष्ठ पलटन नायक ज्ञानोबा लटपटे यांनी शासकीय पंचासमक्ष १२ हजार रुपये स्वीकारले.
आरोपींची अंगझडती घेतली असता नानासाहेब मोखडे यांच्याकडे मोबाईल, रोख २०० रुपये, माणिक वाडेकरकडून रेडमी मोबाईल, रोख ४ हजार ५५५ रुपये,
ज्ञानोबा लटपटेकडून मोबाईल, रोख १०० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांनी केली.