Parbhani Crime 
परभणी

Parbhani Crime | आडगाव फाटा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा ; तीन जण ताब्यात!

१ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त ; पोलिसांची चाहूल लागताच दोघे पसार

पुढारी वृत्तसेवा

बोरी : आडगाव फाटा शिवारात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळताना तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, पाच मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ८३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याची चाहूल लागताच आणखी दोन जणांनी तेथून पळ काढला. फरार झालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आडगाव फाटा शिवारात काही इसम एकत्र येऊन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने नमूद ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांची कारवाई सुरू होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या इसमांमध्ये एकच धावपळ उडाली.

यावेळी तीनजण पोलिसांच्या हाती लागले, तर पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता ३८ हजार ८७० रुपये रोख, अंदाजे ९५ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल तसेच ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ८३ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे.

या कारवाईनंतर फरार झालेल्या दोन्ही इसमांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, जुगाराच्या ठिकाणी नेमके कोण कोण सहभागी होते, तसेच या अवैध जुगारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतही तपास केला जात आहे. या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या इसमांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत आडके, जमादार राजेश जटाळ व संघसेन कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, बोरी परिसरातील आडगाव फाटा शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगारा विरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात चोरून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT