file photo
परभणी

Parbhani Crime : ‘दहा नाही, पाच तरी द्या!’… शेतकऱ्याकडून ५ हजारांची लाच घेताना बोरीचा पोलिस हवालदार ACB च्या जाळ्यात

Parbhani Crime : दहा हजारांची मागणी; तडजोडीनंतर पाच हजारांवर व्यवहार निश्चित

पुढारी वृत्तसेवा

बोरी : न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर बंधपत्राच्या (बेल बॉण्ड) पुढील कार्यवाहीसाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोरी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (दि. २१) रंगेहाथ पकडले.

शेख वसीम शेख हारून (वय ४०, रा. सरफराजनगर, परभणी) असे ताब्यात घेतलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत ६८ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या वादातून बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात परभणी जिल्हा न्यायालयाने तक्रारदाराला अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुन्ह्यातील पुढील कायदेशीर प्रक्रिया व बंधपत्र पूर्ण करण्यासाठी तक्रारदार बोरी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तपास अधिकारी (तपासी अंमलदार) म्हणून कार्यरत असलेले शेख वसीम यांनी बंधपत्राच्या पूर्ततेसाठी लाचेची मागणी केली. सुरुवातीला पाच हजार रुपये मागितल्याने तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली.

तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने १६ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. त्यावेळी हवालदार शेख वसीम यांनी थेट दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मोबाईलवर ‘१०,०००’ असा आकडा टाइप करून तक्रारदाराला दाखवल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे. अखेर तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

दरम्यान, एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि. २१) परभणी शहरातील बी. रघुनाथ हॉलजवळ असलेल्या भंडारी यांच्या हॉटेलमध्ये सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने शेख वसीम यांना जागीच पकडले. याप्रकरणी परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (परभणी) चे पोलिस उपअधीक्षक किशोर तरोणे यांच्या नेतृत्वाखाली मपोनि. पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर निलपत्रेवार, पोलिस हवालदार नामदेव आदमे, पोलिस कॉन्स्टेबल नागरगोजे व घुले यांच्या पथकाने केली. ही मोहीम एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT