परभणी : शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे हेरून चोरटे सर्रासपणे डल्ला मारत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून १ ऑगस्टपासून ‘चोरीमुक्त परभणी’ अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे मोठ्या दरोड्याच्या प्रकरणाचा सहा महिन्यांनंतरही तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीपासून ते तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरातील सहकारनगर परिसरातील रहिवासी व पेडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक कपिल देशमुख यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी ऐवज लंपास केला. याप्रकरणी देशमुख यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर स्मरणपत्रे देऊनही तपासात ठोस प्रगती झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सहकारनगरमधील या घटनेनंतरही शहरातील विविध भागांत चोरीचे सत्र सुरूच आहे. मागील आठवड्यात तसेच काल-परवा शहरातील दोन ते तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची माहिती समोर आली आहे. बंद घरे हेरणाऱ्या चोरट्यांचे धाडस वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. निवासी भागांत पोलिसांची रात्रीची गस्त कितपत प्रभावी आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार चोऱ्या होऊनही चोरट्यांवर पोलिसांचा धाक उरलेला दिसत नाही. त्यामुळे रात्रीची गस्त वाढवणे, संशयित व्यक्ती व वाहनांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्याची मागणी जोर धरत आहे.
कपिल देशमुख यांच्या सहकारनगर येथील घरावर ९ जानेवारी रोजी पडलेल्या मोठ्या दरोड्याच्या तपासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेला तब्बल सहा महिने उलटूनही तपासातून कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास तातडीने स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) सोपवावा, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) उमाप यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १ ऑगस्टपासून ‘चोरीमुक्त परभणी’ अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे ही सकारात्मक बाब असली, तरी यापूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या रखडलेल्या तपासाबाबत सदानंद धामणे आणि धनंजय चौधरी यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला असून, मोठ्या दरोड्याचा तपास अद्याप का लागला नाही, असा सवाल करणारी त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
दरोड्याच्या तपासासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक (DGP), विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना आतापर्यंत किमान सात स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही तपासात काही निष्पन्न झाले नाही, असा आरोप कपिल देशमुख यांनी केला. त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कारभारावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या तपासाला विलंब होत असल्याने वरिष्ठ यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तपासाची दिशा स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोठ्या दरोड्याचा तातडीने छडा लावून आरोपींना अटक करावी, यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. यवतमाळचे खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, कृषीभूषण कांतराव झरीकर आदींनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले असून वरिष्ठ पातळीवरून या तपासाचा तातडीने आढावा घेण्याची मागणी होत आहे.