पूर्णा : शहरातील टी-पॉईंट कॉर्नर येथे सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर एका कंत्राटदाराने बंदीस्त नाली बांधकाम व त्या लगत दर्जेदार सिमेंट रोडचे बांधकाम करण्याचे काम घेतले आहे. या कंत्राटदाराने या पूर्वी येथील नालीचे खोदकाम करुन बांधकाम करत काही ठिकाणी ती सिमेंट स्लॅप टाकून बंदीस्त करुन घेतली तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. त्याच बरोबर घेतलेल्या कंत्राट निधीतूनच दर्जेदार सिमेंट रोडचे बांधकाम करण्याचे काम असताना एकतर्फा सिमेंट रोडचे बांधकाम करुन एक साईड रोडचे सिमेंट बांधकाम गेल्या काही दिवसांपासून संबंधित कंत्राटदाराने रखडवीले आहे.
परिणामी, येथून वाहतूक करणे कठीण होत आहे.एक साईड रस्त्यावरुन ऊसाची वाहतूक करणे देखील तारेवरची कसरत बनली आहे. ठेकेदार उर्वरित सिमेंट रोडचे बांधकाम करीत नसतानाही सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता जाणिवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. शिवाय, येथून उडणा-या धुळीमुळे नागरीक हैराण होत आहे. उडणारी धुळ बाजूच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थांवर बसून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. एक साईड सिमेंट रोडचे बांधकाम सोडून देण्यात आल्यामुळे खालीवर झालेल्या रस्त्यावर काही वेळा वाहनांची रेलचेल वाढताच येथे ट्राफिक जाम होत आहे. या टी-पॉईंट कॉर्नरवर वाहतूकीची एकच कोंडी होत असून मोठ्या प्रमाणावर धुराडा उडून ये - जा करणारे पादचारी, वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हास्तरावर लक्ष देवून ही समस्या दूर करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
येथील टी-पॉईंट कॉर्नर जवळच असलेल्या पूर्णा-अकोला रेल्वे लोहमार्गाखालून दमरेने या पूर्वी भुयारी पूल बांधला आहे. त्या वेळी भुयारी पूलाखाली व एस्सार पेट्रोल पंप व टि पॉईंटकडे येणाऱ्या रस्त्यात साचून राहणारे पावसाचे पाणी उताराला वाहून जाण्यासाठी नाली निर्माण केली नसल्याने पावसाळ्यात आलेल्या पुराचे पाणी येथे साचून राहून वाहतूक ठप्प होत होती. ही बाब आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शासनदरबारी प्रयत्न करुन येथे साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी टी-पॉईंट कॉर्नर जवळून नाली खोदकाम बांधकाम व तेथे सिमेंट रस्ता तयार करण्याकरीता सा.बां उपविभाग पुर्णाकडे भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर हे काम करण्यासाठी एका ठेकेदाराने टेंडर घेतले. परंतू हे काम अपूर्ण अवस्थेत सोडले गेले. याकडे आता आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी देखील लक्ष घालून काम पूर्ण करुन घेणे आवश्यक असल्याचे नागरीक बोलून दाखवत आहेत.
पूर्णा शहरातून झिरोफाटा हिंगोलीकडे,नांदेडकडे, ताडकळसकडे जाणा-या टी-पॉईंट कॉर्नर रस्त्यावर बांधकाम विभागाने सिमेंट रस्ता बांधकामांचे काम हाती घेतले आहे. या कामाचे कंत्राटदार यांनी दोन महिन्यांपासून काम बंद ठेवल्याने खोदलेल्या रस्त्यामुळे धुळीचे लोट उडत असून ती धुळ दुकानात जात असल्याने याचा परिणाम व्यापारावर होत आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होवून वाहनस्वार जखमी होत आहेत. संबंधीत प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन धुळीचा बंदोबस्त करावा व रस्त्याचे काम मार्गी लावावे.श्यामराव कदम, नागरीक पूर्णा