Manwath Bandh
मानवत : शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली कथित गुंडगिरी, अवैध धंदे, भरधाव वाहनचालकांचा त्रास आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ९) मानवत शहरातील नागरिकांनी बंद पाळत पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात मानवत शहरातील काही कथित गावगुंड आणि त्यांच्या साथीदारांकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे, अवैध धंदे चालविणे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
८ जुलै रोजी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक ॲड. विक्रमसिंह मधुकरराव दहे आणि त्यांचे बंधू अभयसिंह दहे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा उल्लेख करत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली. शहरातील लोकप्रतिनिधीवरच भरदिवसा हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असतानाही गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही भागांत अवैध दारूविक्री, सावकारी, नागरिकांच्या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याचे प्रयत्न तसेच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण वाढल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला.
संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, शहरातील अवैध धंद्यांवर धडक मोहीम राबवावी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या.
मोर्चा व निवेदन सादरीकरणावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव, व्यंकटेश चौधरी, जनार्दन कीर्तने, माजी नगरसेवक शिवाजी पाटील, नरसय्या कुरपटवार, शंकर कच्छवे, प्रा. अनंत गोलाईत आदी उपस्थित होते. निवेदनावर ॲड. सतीश चव्हाण, कपिल मुडपे, मोहन बारहाते, प्रकाश कुलथे, राजेश कच्छवे, वामन चव्हाण, तुकाराम चव्हाण, दिगंबर दहे, संदीप दहे, संकेत कच्छवे, रघुवीर लाड, सार्थक दहे, शुभम दहे, अविनाश दहे, आकाश दहे, भारत देशमाने, रतन दहे, मोहन दहे, प्रताप दहे, अमर पतंगे, उमेश महाडिक, गजानन दहे यांच्यासह सुमारे १०० ते १५० नागरिकांच्या सह्या आहेत.
दहशतीखाली शहर किती दिवस?
मानवत शहरात वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधींवर होणारे हल्ले, अवैध धंद्यांचे आरोप, भरधाव वाहनांचा त्रास आणि सार्वजनिक ठिकाणांवरील बेकायदेशीर हालचाली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ तक्रारींची नोंद घेण्यापेक्षा पोलिस प्रशासनाने प्रभावी कारवाई करून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.